Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मी आर.आर. पाटील कुटुंबाची माफी मागितली’; अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवठे-महांकाळ या ठिकाणी घेतलेल्या सभेत महाराष्ट्राचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला. आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. यावरून सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली आहे. मी पाटील कुटुंबाची माफी मागितली आहे. कारण मला ते विधान पटलं नाही, असं त्या म्हणाल्या.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटीलनं माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापयाचे धंदे झाले राव, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा    –      महाराष्ट्रात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार, निवडणूक आयोगाची माहिती 

अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, मंत्री झाल्यानंतर तुम्ही शपथ घेता ती गोपनीयतेची असते. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना फाईल दाखवलीच कशी? महाराष्ट्राशी हा विश्वासघात नाही का? ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप कुणी केले होते? तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यामुळे उत्तर त्यांना द्यावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवण हे चिंताजनक आहे.

आर. आर. पाटील हे माझ्या भावाप्रमाणे होते. त्यांचं निधन ९ वर्षांपूर्वी झालं. आता त्यांच्या निधनानंतर अजित पवारांनी अशा प्रकारे आरोप करणं हे चुकीचं आहे. तसंच मला त्या आरोपामुळे मला खूप दुःख झालं. ७० हजार कोटींचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला पाहिजे. मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी चर्चा केली मी त्यांना सॉरीही म्हटलं. कारण मला खूप दुःख झालं. आर. आर. पाटील यांचं निधन ९ वर्षांपूर्वी झालं आहे. आज त्यांची आई, त्यांची पत्नी, मुलं हयात आहेत. त्यांना या आरोपांमुळे काय वाटलं असेल? हे वाटूनच मी त्यांना सॉरी म्हटलं. आर. आर. पाटील अत्यंत इमानदार नेते होते. विरोधकांनी मागणी केल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी संमती दिली कारण जर आरोप खोटे असतील तरीही ते झाले आहेत त्यामुळे आर. आर. पाटील यांनी निष्पक्षपणे चौकशी लावली असेल ही बाब कौतुकास्पद आहे. यावर आत्ता अशाप्रकारे आरोप होणं हे वेदनादायी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button