अजित पवारांबाबत प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंनी जोडले हात; म्हणाल्या..
पुणे | लोकसभा निवडणुकीत देश पातळीवर एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी त्यांच्या जागांमध्ये मोठी घट झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटानं ४ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना सुनील तटकरेंच्या रुपात एकाच ठिकाणी विजय मिळाला आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडून उत्तर दिलं.
अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आता लोकसभा निवडणूक निकालांनंतर त्यांचा निर्णय चुकल्याचं पुन्हा एकदा बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता निकालांनंतर अजित पवारांना काय सल्ला देणार? असा प्रश्न पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हात जोडून उत्तर दिलं. मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा – नागरिकांसाठी खुशखबर..! महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती
https://www.facebook.com/supriyasule/videos/1484302385826578/
साताऱ्यात दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या पिपाणी चिन्हामुळे पराभव झाल्याचा दावा जयंत पाटील व शशिकांत शिंदे या दोघांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनीही त्या दाव्याला समर्थन दिलं आहे. जर पिपाणी नसती, तर आमची साताऱ्याची सीट आली असती. दिंडोरीलाही पिपाणीनं मोठी मतं घेतली. हा रडीचा डाव आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.