‘आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; किशोर आवारेंच्या आईची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
![Sulochana Aware said that the accused in the Kishore Aware murder case should be given death penalty](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/chandrakant-patil-2-780x470.jpg)
पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना चोवीस तासात अटक केली. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आणि किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी ‘माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा – यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार, मान्सूनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम..
आवारे यांच्या जाण्याने कुटुंबावर डोंगर कोसळला असून या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थणा करतो. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.