हॉर्न वाजवण्यावरून काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक
१२० जणाविरूद्ध चार गुन्हे दाखल
काँग्रेस कार्यकर्त्यांना वाहनांचे हॉर्न वाजविण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यावरून वादाला सुरूवात झाली. वादाचे रूपांतर दगडफेकीपर्यंत गेले. यामध्ये १५ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील कोडेकल येथे घडली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत १२० जणाविरूद्ध चार गुन्हे दाखल केले आहेत. यातील १८ जणांना अटक करण्यात आली आहे. यात जखमी झालेल्या सहा जणांना विजयपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. गावातील बसवण्णा देवरू यांच्या वार्षिक जत्रेजवळून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या वाहनातून जात होते. जत्रेच्या मध्यभागी काँग्रेस कार्यकर्त्यांना वाहनांचे हॉर्न वाजविण्यास भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे वाद सुरू झाला व त्यानंतर दगडफेक झाली. यात १५ वाहनांच्या मागील खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि सहा जण जखमी झाले.
पोलीस अधीक्षक सी.बी. वेदमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजल्यापासून कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील हुनसागी तालुक्यातील कोडेकलचा समावेश असलेल्या शोरापूर विधानसभा मतदारसंघात सीआरपीसीच्या कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. कर्नाटक राज्य राखीव पोलीस (KSRP) च्या तीन प्लाटून आणि निमलष्करी दलाच्या दोन प्लाटून, दोन पोलीस उपअधीक्षक, ५ सर्कल निरीक्षक, १० उपनिरीक्षक, १०० कॉन्स्टेबल गावात आणखी चकमक होऊ नये म्हणून तैनात करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.