‘महिला आरक्षण राजीव गांधींचे स्वप्न, विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा’; सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया
![Sonia Gandhi said that women's reservation was Rajiv Gandhi's dream](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Sonia-Gandhi--780x470.jpg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेतील पहिल्याच भाषणात महिला आरक्षण विधेयक सादर केलं. या विधेयकावर संसदेत चर्चेला सुरूवात झाली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी सहभागी झाल्या. त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच हे विधेयक सर्वात आधी राजीव गांधी यांनी सादर केलं होतं, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधी म्हणाल्या, भारतीय स्त्रियांच्या मनात महासागराइतका संयम आहे. भारतीय स्त्रीने तिच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केली नाही. केवळ स्वतःच्या फायद्याचा कधी विचार केला नाही. तिने नदीप्रमाणे सर्वांचं भलं करण्याचं काम केलं आणि अडचणीच्या काळात हिमालयाप्रमाणे उभी राहिली. तिच्या धैर्याचा अंदाज लावणं अवघड आहे. आराम काय असतो ते तिला माहितीच नाही. परंतु, तिला राजकीय क्षेत्रात तितका आदर मिळाला नाही.
हेही वाचा – गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या..
"It was Rajiv Gandhi's dream…,": Sonia Gandhi on Women's Reservation Bill
Read @ANI Story https://t.co/brV3llm2Ih#SoniaGandhi #WomenReservationBill #RajivGandhi pic.twitter.com/mxouead031
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2023
सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, अरुणा असफ अली, विजयलक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृत कौर आणि त्यांच्याबरोबर लाखो महिलांनी देशासाठी योगदान दिलं. अडचणीच्या काळात या स्त्रियांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना आझाद यांची स्वप्नं सत्यात उतरवली. माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व यातलंच एक मोठं उदाहरण आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
आज माझ्या आयुष्यातला मोठा मार्मिक क्षण आहे. देशात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांची भागीदारी निश्चित करणारं संविधान संशोधन विधेयक माझे पती आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत मांडलं होतं. परंतु, राज्यसभेत ते सात मतांनी पडलं. त्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने ते विधेयक पारित केलं. त्यामुळेच आज आपल्या देशात स्थानिक पातळीवर निवडून आलेल्या १५ लाख महिला आहेत. त्यामुळे राजीव गांधी यांचं अर्ध स्वप्न पूर्ण झालं आहे. आता हे विधेयक पारित झाल्यावर त्यांचं स्वप्न पूर्ण होईल, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.