पंचायत समिती कुडाळ गणात सोमनाथ कदमांचा ‘गावभेटी’चा धडाका; प्रस्थापितांचे धाबे दणाणले!
'मी मत मागायला नाही, समस्या जाणून घ्यायला आलोय'; अपक्ष उमेदवार सोमनाथ कदमांच्या भूमिकेला मतदारांचा उदंड प्रतिसाद

जावली | प्रतिनिधी
जावली तालुक्यातील कुडाळ पंचायत समिती गणाची निवडणूक आता अत्यंत चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे राजेंद्र शिंदे आणि भाजपचे सौरभ शिंदे यांच्यातील थेट लढत मानली जात असतानाच, कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी अपक्ष शड्डू ठोकल्याने येथे आता ‘तिरंगी’ मुकाबला रंगला आहे. कदम यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे प्रस्थापित पक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, ते ‘जॉइंट किलर’ ठरणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
स्वच्छ प्रतिमा आणि थेट संवाद
स्वर्गीय गणपत शंकर कदम (माजी व्हाईस चेअरमन, कुडाळ सोसायटी) यांचा वारसा लाभलेले सोमनाथ कदम यांची सरपंच पदाच्या काळातील निष्कलंक कारकीर्द हीच त्यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे. प्रचारादरम्यान आश्वासनांचा पाऊस न पाडता, “मी मत मागायला नाही, तर तुमच्या समस्या जाणून घ्यायला आलोय,” ही त्यांची प्रामाणिक भूमिका महिला आणि तरुणांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विकासकामात ‘टक्केवारी’च्या राजकारणाला थारा न देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
’कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का?’
गावभेटी दरम्यान कदम यांनी प्रस्थापितांना टोकदार सवाल केला. “प्रत्येक वेळी मोठी पदे ठराविक घराण्यांकडे किंवा लोकांकडेच का? सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? कार्यकर्त्यांना मोठे कधी करणार?” हा त्यांचा सवाल सर्वसामान्यांच्या मनाला भिडत आहे. शेतकरी कुटुंबातील वारसा आणि ‘हक्काचा माणूस’ ही ओळख त्यांना जनमानसात आघाडी मिळवून देत आहे.

हेही वाचा : थेरगाव येथील रॉयल कॅसल सोसायटी 5-स्टार मानांकनाच्या उंबरठ्यावर..!
दहा गावांचा झंझावाती दौरा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी सर्जापूर सरताळे कुडाळ बामनोली भिवडी सोनगाव बेलवडे आरडे सावंतवाडी गोपाळकांताचीवाडी पानस या गावांचा झंझावाती दौरा पूर्ण केला. यावेळी त्यांच्यासोबत नितीन मोरे, किरण कदम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मोठ्या सभांऐवजी वैयक्तिक गाठीभेटी आणि कोपरा सभांवर त्यांनी भर दिला असून, प्रत्येक घरात ते हक्काने पोहोचत आहेत.
बड्या पक्षांची गणिते बिघडणार?
सोमनाथ कदम यांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या रणनीतीत मोठा बदल झाला आहे. प्रस्थापितांविरुद्धचा रोष आणि कदमांना मिळणारा प्रतिसाद पाहता, कुडाळ गणात नक्की कोणाचे गणित बिघडणार आणि कोणाची लॉटरी लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
निवडणुकीचे कळीचे मुद्दे:
भ्रष्टाचाराचा डाग नसलेली विकासकामे.
सर्वसमावेशक नेतृत्व: सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य.
प्रस्थापितांना आव्हान: घराणेशाही आणि मक्तेदारीविरुद्ध दिलेला लढा.




