देहूत आंदोलनाच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू दौर्याच्या पार्श्वभूमीवर आज आंदोलनाच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. भापकर यांना सकाळीच पोलीसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे लगतच्या विस्थापित होणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्यसरकार, स्थानिक स्वराज्य संस्था बरोबर केंद्र सरकारने घ्यावी या मागणीसाठी मारूती भापकर यांनी आज (दि.१४) श्री क्षेत्र देहू येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहुमधील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकरिता येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मारूती भापकर यांनी लाक्षणिक उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आज सकाळीच भापकर यांना पोलीसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.