आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सरकारकडून SIT चौकशी

मुंबई : दिशा सालियान प्रकरणी विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांनी चौकशीची मागणीही केली होती. दरम्यान, राज्य सरकार आदित्य ठाकरेंची SIT चौकशी करणार आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांकडून या प्रकरणात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने कोणताही निर्देश देण्यापूर्वी आदित्य यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती यामध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचा – नवाब मलिक अजित पवार की शरद पवार गटात? अजित पवारांचं सूचक विधान
दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा १४ जून २०२० या दिवशी मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू झाला. तिचा ९ जून २०२० ला संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मुंबईच्या मालाडमधल्या एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन खाली कोसळून तिचा मृत्यू झाल्याची माहिती तेव्हा समोर आली. नंतर तिच्या मृत्यूचा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं गेलं. याच प्रकरणात आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.




