१०० कोटींची वसूली ते ठाकरेंना अडकवण्याचा प्लॅन; श्याम मानव यांचा मोठा दावा
![Shyam Manav said that Anil Deshmukh was offered to save him from ED action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Shyam-Manav-780x470.jpg)
मुंबई | अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती. यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार या चार नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले होते. अनिल देशमुख यांनी सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे.
श्याम मानव म्हणाले, ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. परंतु अनिल देशमुख यांनी ते ऑफर नाकारली. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना १३ महिने कारागृहात राहावे लागले. त्यांनी सही दिली असती तर उद्धव ठाकरे यांना कारागृहात पाठवता आले असते.
सत्ता आल्याबरोबर त्यांनी नखे बाहेर काढली. ती नखे आता ओळखली पाहिजे. संजय राऊत यांच्यासंदर्भात काही सिद्ध झाले का? महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे निरोप जात तुमच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवले आहे. त्या प्रतिज्ञापत्रावर सही करा. पहिले प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवले आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करुन द्या, असे आदेश दिल्याचे होते. दुसरे प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचा मुलगा दिशा सालियान या मुलीवर अत्याचार केला आणि तिचा खून केला, असे होते.
हेही वाचा – Pune | ‘पीएमआरडीए’च्या अतिक्रमण विभागाची दुटप्पी भूमिका
तिसरे प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्या गैरव्यवहारावर सही करण्यासंदर्भात होते. चौथे प्रतिज्ञापत्र असे होते की, त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल देशमुख यांना बोलवले होते. त्यावेळी पार्थही होते. त्यावेळी त्यांनी ऑफर दिली अजित पवार यांनी गुटखा व्यावसायिकांकडून पैसे गोळे करुन द्या, असे सांगितले होते. अनिल देशमुखांनी याबद्दल विचार केला आणि हे करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा निरोप देण्यात आला की अजित पवारांच्या प्रतिज्ञापत्रकावर सही करु नका. इतर तीन प्रतिज्ञापत्रकावर सही करा.
अनिल देशमुखांनी याबद्दल प्रचंड विचार केला. मी जर सही केली तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तिघेही जेलमध्ये जातील. हा सर्व विचार केल्यानंतर अनिल देशमुखांनी सही केली नाही आणि स्वत: १३ महिने जेलमध्ये राहिले. त्यामुळेच मी अनिल देशमुखांचे कौतुक करतो. कारण याला खरा मर्दपणा म्हणतात. यानंतर काही महिन्यांनी कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली. मी आयुष्यभर जेलमध्ये राहायला तयार आहे. पण मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही, असे अनिल देशमुखांनी त्यावेळी सांगितलं होतं, असंही श्याम मानव म्हणाले.