‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे, ‘या’ दिवशी होणार मुंबईत बैठक
![Shiv Sena to host opposition meeting in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Mumbai-780x470.jpg)
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील सरकारविरोधात विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. २६ विरोधी पक्षाच्या आघाडीला ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स) असं नाव दिलं आहे. बिहारच्या पाटणा आणि कर्नाटकच्या बंगळुरू नंतर आता मुंबईत विरोधकांची पुढची बैठक होणार आहे.
नाना पटोले म्हणाले की, इंडिया आघाडीची आगामी म्हणजेच तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर ला मुंबईत पार पडेल. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करत आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष ठाकरे गट, शरद पवार गट आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी पाच नेत्यांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे. हे १५ नेते बैठकीचं नियोजन करतील. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या पथकात असतील.
हेही वाचा – ‘मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा नाही, कारण..’; बच्चू कडू यांचं सूचक विधान
खासदार संजय राऊत म्हणाले की, पाटणा, बंगळुरूनंतर ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईतच्या ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये ‘इंडिया’ची बैठक होईल. ३१ ऑगस्टला संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि १ सप्टेंबरला ही बैठक चालेल. ३१ ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी सर्व निमंत्रिकांसाठी एका भोजनाचे आयोजन केले आहे. १ सप्टेंबरला १०.३० ला बैठक सुरू होईल. ३ वाजेपर्यंत ही बैठक होईल नंतर पत्रकार परिषद होईल. मुंबईच्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. प्रत्येकाकडे काही जबाबदाऱ्या आहेत ज्यांचे वाटप आज करण्यात आले आहे.