खासदार बारणेंमुळे शिवसेनेला पणवती ; शहरप्रमुख सचिन भोसले यांची टीका
पिंपरी: शिवसेना खासदार श्रीरंग बारणे म्हणजे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला लागलेली पणवती होती, ते ज्या पक्षात जातात तो पक्ष संपवतात. ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसची संख्या कमी झाली. ते शिवसेनेत आले शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली. आता ते एकनाथ शिंदे गटात गेले आहेत ते एकनाथ शिंदेंचा गट ही संपवणार आहेत, अशी टीका शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने गुरुवारी ( दि. २१ जुलै २०२२) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. सचिन भोसले यांनी खासदार श्रीरंग बारणे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली.
यावेळी शिवसेना शहर उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, प्रसिद्धीप्रमुख भाविक देशमुख, अल्पसंख्यांक प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, विधानसभा प्रमुख आनंद कोराळे, विधानसभा संघटिका अनिता तूतारे, माजी विधानसभा संघटिका मंगलताई घुले, शहर संघटक रोमी संधू, विशाल यादव, युवा सेना अधिकारी माऊली जगताप, उपशहर प्रमुख तुषार नवले, पांडुरंग पाटील, अमोल निकम, सुधाकर नलावडे, युवराज कोकाटे, रावसाहेब थोरात, परशुराम अल्हाट आजी-माजी पदाधिकारी व युवा सेना व शिवसैनिक उपस्थित होते.
हिंमत असेल तर पुन्हा जिंकून दाखवा…
यावेळी ॲड. सचिन भोसले म्हणाले की, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या या गद्दार लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी शिवसैनिकांनी स्वतःच्या घरादाराकडे दुर्लक्ष करून निवडून दिले. खासदार बारणे, माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. तुमच्यावर गद्दार म्हणून बसलेला हा शिका पुढच्या पाच पिढ्या पुसता येणार नाही. तुमची जी संख्या आहे ती शिवसैनिकांमुळेच आहे. शिवसेनेचे प्रतिनिधी होऊन तुम्ही जी संपत्ती जमा केली ही लपवण्यासाठीच तुम्ही आता शिवसेनेशी गद्दारी केली आहे, असेही ॲड. भोसले यांनी म्हटले आहे.