Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना ९०, राष्ट्रवादी ९०, काँग्रेस ९०; महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जागावाटपात इतर घटक पक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आले असून उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना सोडण्याचे निश्चित झाले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, थोरात यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत घटक पक्षांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ठेवण्यात आला तसेच उर्वरित उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. केंद्रीय निवडणूक समितीने काँग्रेस उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. आज पुन्हा एकदा ऑनलाइन बैठक घेऊन यावर चर्चा केली जाईल व सर्व उमेदवार ठरतील, असे बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

हेही वाचा    –      ‘यंदा पण कोथरूडकर मला मोठ्या मताधिक्क्याने निवडून देतील’; चंद्रकांत पाटलांना विश्वास

महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. महाराष्ट्रातील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत आणि राज्यात बसलेले भ्रष्ट सरकार लोकच हटवणार आहेत आणि महाविकास आघाडीच्या हाती सत्ता देणार आहेत, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीने तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी ८५ जागांवर लढणार असल्याचे सांगितले होते. बाळासाहेब थोरात यांनी आज दिल्लीत बोलताना हा फॉर्म्युला आता ९०-९०-९० झाल्याचे सांगितले. मित्रपक्षांना सोडलेल्या जागांमधून या प्रमुख पक्षांना काही जागा मिळू शकतात का, असे विचारले असता ती बेरीज अजून केलेली नाही, असे थोरात म्हणाले. महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button