breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणूक : शिरुरची जागा राष्ट्रवादी अजित पवारांकडे; वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक!

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाटेवर?

पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ही जागा अजित पवार आपल्याकडे घेणार हे जवळपास निश्चित झाले होते. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली. त्यामध्ये शिरूर लोकसभेची जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार असल्याचे ‘फिक्स’ झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप निश्चित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी महायुतीत सहभागी असलेल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची एक बैठक मंगळवारी रात्री उशिरा पार पडली.

हेही वाचा     –    ‘सडून मरेल पण मागे हटणार नाही’; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही आमदार, खासदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे डॉ.कोल्हे हे शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांनी डॉ.कोल्हे हेच आमचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. शिरूरमधून तीन टर्म प्रतिनिधित्व करणारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत त्यांच्याकडे गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.

आढळराव राष्ट्रवादीच्या वाटेवर…

दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याबाबत आढळराव यांनी आपल्या समर्थक नेत्यांची बैठक बोलावली असून, आगामी आठवडाभरात निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे, भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांनीही भाजपा पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार विलास लांडे यांनीही अजित पवार यांनी संधी दिल्यास लोकसभा लढवणार आहे, असा दवा केला आहे. त्यामुळे अजित पवार या मतदार संघातून कोणच्या नावाला पसंती देतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button