‘पिंपळे सौदागर-रहाटणी ते मेट्रो स्टेशन पर्यंत फिडर बस सेवा सुरू करा’; माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे
पिंपरी : पिंपळे सौदागर-रहाटणी येथून परिसरातील नागरिकांना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी पीएमपीएल मार्फत फिडर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे. पीएमपीएल वाहतूक व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.
शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो सेवेचे लोकार्पण झाले. या मेट्रो सेवेचा नागरिक जास्तीत जास्त प्रमाणात कसा वापर करतील अश्या पर्यायांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. प्रभाग क्र.२८ मध्ये सुमारे ६० ते ७० हजार नागरिक वास्तव्यास असून दिवसेंदिवस त्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील नोकरदार, शालेय विद्यार्थी, कॉलेजला जाणारा तरुण वर्ग तसेच महिला व जेष्ठ नागरिक हे दैनंदिन कामकाजासाठी पुणे शहरात ये-जा करतात. प्रभागातून मेट्रो स्टेशनचे अंतर लांब अंतरावर आहे. पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील नागरिकांची या मेट्रो सेवेचा लाभ घेण्याची प्रबळ इच्छा आणि उत्साह आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना जर मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली तर पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील बरेचशे स्थानिक रहिवासी या मेट्रो सेवेचा वापर करतील.
हेही वाचा – औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर प्लँट’साठी पुढाकार!
याचा सुविधेचा फायदा मेट्रो रेल्वेला होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी पीएमपीएल मार्फत मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी जी फिडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे, तशीच फिडर बस सेवा प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर- रहाटणी मधून सुरू करावी. त्यामुळे नागरिकांना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचणे सोयीचे होईल, असे काटे म्हणाले.