breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचे नाही’; राज्यातील तणावपूर्ण स्थितीवर शरद पवारांचं भाष्य 

Sharad Pawar | बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. यावरून देशात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातही काही ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळाले. यानंतर राज्यात तणावपूर्ण परिस्थिती दिसली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, बांगलादेशमध्ये सत्तांतर झाले. यासाठी तरुण पिढीने उठाव केला होता. त्यातून काही गोष्टी घडल्या. पण दुर्दैवाने त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटली. प्रामुख्याने बांगलादेशच्या सीमेवरील पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात परिस्थिती अधिक गंभीर होती. पण तिथे काही घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असे कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तींनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढेच मी सांगू इच्छितो.

हेही वाचा     –      क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार

शासनाचे धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचे जास्त महत्त्व वाटते. म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल, याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल, असे काही करू नये हे माझे आवाहन आहे, असं शरद पवार म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्य दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना संबंध देशाच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी भूमिका मांडली. ती भूमिका मांडून १२ तास होत नाहीत, तोवरच चार राज्यांची निवडणूक वेगवेगळी जाहीर झाल्याचे पाहायला मिळाले. संबंध देशाची निवडणूक एकत्र घेण्याची भूमिका मांडत असताना त्यांनी झारखंड व महाराष्ट्रात निवडणूक जाहीर केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणात विसंगती दिसत आहे, एवढेच याप्रसंगी बोलू शकतो, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button