breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत धक्कादायक! शरद पवार

मुंबई | बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. १३ ऑगस्टला घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी बदलापूरमध्ये २० ऑगस्टला प्रचंड जनक्षोभ उसळला होता. बदलापूरमध्ये रेल रोकोही करण्यात आला. मात्र हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं त्यात बदापूरचे लोक कमी होते आणि बाहेरून लोक आणले होते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावरून शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

शरद पवार म्हणाले, बदलापूरमध्ये दोन अजाण बालिकांवर शैक्षणिक संस्थेच्या आवारात अत्याचार होतो ही गोष्ट प्रचंड धक्कादायक आहे. साहजिकच त्याची प्रतिक्रिया उमटलेली आपण पाहिली. बदलापूरमध्ये झालेला प्रकार धक्कादायक आहे त्या प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. राज्य सरकारने अशा प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे.

बदलापूरसारखी घटना घडते तेव्हा गृहखात्याची यंत्रणेने अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे. तसंच या प्रकरणात जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरपुरतं सीमित नव्हतं. मागच्या तीन ते चार दिवसात अशा घटना समोर आल्या आहेत. बालिकांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवाने दिवसेंदिवस वाढतं आहे हे पाहण्यास मिळतं आहे. या प्रकरणांतून लोकांचा उद्रेक होतो आहे, राग व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून शांततापूर्ण बंद पुकारला आहे. लोकांची भावना सरकारपर्यंत पोहचली पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा     –    रेल्वे सेवा आणि बस बंद..; उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन 

बदलापूरमध्ये लोक कमी होते, आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असं मुख्यमंत्री म्हणाले. पण हे राजकीय होतं म्हणणं योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं बोलले नसते तर बरं झालं असतं. मला सांगा तिथे कुठला राजकीय पक्ष होता? हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याचा आणि भावना मांडण्यासाठीचा आहे. इथे कुणीही राजकारण आणलेलं नाही. आम्हा लोकांच्या मनातही नाही की अशा प्रकारे राजकीय हेतूने काहीतरी करावं. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त करणं हाच हेतू आहे. माझी मुख्यमंत्र्यांना आग्रहाची विनंती आहे की याकडे तुम्ही जसं पाहता आहात तसं पाहू नये, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र बंदमध्ये माझ्या पक्षाचे सगळे सहकारी सहभागी होतील. बंद शांततेत पार पडला पाहिजे आणि सामाजिक घटकांनी यात सहभागी झालं पाहिजे. तसंच राज्यात जे काही लाजिरवाणे प्रकार घडत आहेत त्यासंबंधी तीव्र भावना व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. महाराष्ट्रातली जनता मुलीबाळींच्या हितासाठी, सुरक्षेसाठी जनमत तयार करायला या बंदमध्ये सहभागी होतील आणि वेदना व्यक्त करतील, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button