‘काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत’; न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया
![Sharad Pawar said that some decisions are yet to be made](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/sharad-pawar-6-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (११ मे) लागला. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना सोपवला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती जैसे थे करता आली असती असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शरद पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील काही मुद्द्यांमध्ये कोर्टाने साधारणपणे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यासंबंधीची तीव्र भूमिका मांडली. या निकालात विधिमंडळ पक्ष मान्य नसून जो राजकीय पक्ष आहे त्याचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा विषय सोपवण्यात आला आहे. हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांची भूमिका घेतील तेव्हा त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडण्यात येईल.
हेही वाचा – न्याय मेलेला नाही.. न्यायालयाच्या निकालानंतर सामनातून शिंदे-फडणवीस सराकर जोरदार टीका
विधानसभा अध्यक्ष हे इन्स्टिट्युशनल पद आहे. या पदाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी या पदाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी. अपेक्षा आहे इन्स्टिट्युशनसंबंधी या लोकांमध्ये किती आस्था आहे, हे उद्या त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले.
माझ्या पुस्तकात मी याबाबत स्पष्टपणे लिखाण केल्याने आमचे मित्र नाराजही झाले. पण त्यामागे नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती. आज सुप्रीम कोर्टाने तीच गोष्ट व्यक्त केली. मात्र झाल्या त्या गोष्टी झाल्या. आता आम्ही, उद्धव ठाकरे, काँग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरुवात करू, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.