‘वय ८४ होऊ द्या, ९० होऊ द्या हे म्हातारं थांबत नाही’; शरद पवारांचं वक्तव्य
![Sharad Pawar said that old age does not stop, let it be 84, let it be 90](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Sharad-Pawar-780x470.jpg)
Sharad Pawar | अजित पवार जुलै २०२३ ला महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांनी एका भाषणात शरद पवाराच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. वय ८१, झालं ८२ झालं तुम्ही थांबणार की नाही? आम्ही काम करतो तुम्ही मार्गदर्शन करा, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करत एक महत्वाचं विधान केलं आहे.
शरद पवार म्हणाले, की आपल्यापुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? सामान्य लोकांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा की आणखी कुणाच्या हातात द्यायचा? आज सांगितलं जातं की आम्ही नवीन नवीन योजना काढल्या. रोज वर्तमानपत्र उघडलं की नवीन योजना बघायला मिळतात. कधी बहिणीबाबत असतात. कुठल्याही व्यक्तीला बहिणीबाबत आस्था असतेच. बहीण ही कुटुंबातली जिवाभावाची व्यक्ती असतेच. बहिणीचा सन्मान केला तर माझ्यासारख्याला, तुम्हाला आणि सगळ्यांना मनापासून आनंद होतो. पण एक गंमत आहे बघा मागच्या दहा वर्षांत बहीण आठवली नाही. पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य होतं तेव्हा बहीण दिसली नाही. नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी? लोकसभेला महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या म्हणून बहीण आठवली.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने ‘सारथी’च्या मुख्य इमारतीचे उद्घाटन
पण एक सांगतो, तुमच्यापेक्षा बारामतीकर हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. ती निवडणुकीला उभी राहिल्यानंतर कुणी काहीही म्हणो बारामतीकर निवडणूक प्रचाराला गेलो की गप्प बसायचे. मी म्हटलं झालं काय? कुणी काही बोलत नाही. मतमोजणी झाली तेव्हा कळलं की १ लाख ६० हजार मतं बहिणीला बारामतीकरांनी दिली. याचा अर्थ हा आहे की लोक राजकारण्यांपेक्षा जास्त शहाणे आहेत. लोकांना कळतं काय करायचं? कुणासाठी करायचं आणि कधी करायचं. आज महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी काही निवडणुकीला उभा नाही. १४ वेळा निवडणुकीला सामोरा गेलो. सातवेळा दिल्लीची आणि सातवेळा महाराष्ट्राची. सालगड्याला पण सुट्टी देतात पण मला कुणी सुट्टीच दिली नाही, असं शरद पवार म्हणाले.
आत्ता या ठिकाणी काही तरुण मुलं माझा फोटो असलेला बोर्ड घेऊन उभे होते. माझ्या फोटोच्या खाली लिहिलं होतं, ८४ वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करु नका. अजून लांब बघायचं आहे. ८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही, तुम्ही काही काळजी करु नका. ज्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला त्यांचे मी आभार मानतो, असंही शरद पवार म्हणाले.