ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवारांच्या भेटीवर छगन भुजबळांच मोठं वक्तव्य

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकला जाताना दिसतोय. त्यामुळे वातावरण शांत व्हावं या उद्देशाने आपण शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भुजबळांनी “मी आजही राजीनामा द्यायला तयार आहे”, असं मोठं वक्तव्य केलं.

“गरीब दोन्ही समाजात आहेत. त्यात काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत. लग्नात जायचे नाही, हॉटेलात जायचे नाही, हे कधी थांबणार? यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. हे थांबले पाहिजे यसाठी मी पुढाकार घेतला. शरद पवारांनी हे पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे. शरद पवारांना अनुभव जास्त आहे. राज्यात शांतता निर्माण होण्यासाठी शरद पवारांची मदत घेतली तर काय हरकत आहे?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

‘मी आजही राजीनामा द्यायला तयार’
“राज्यात कटुता वाढत आहे. ती शांत राहिली पाहिजे. पटविण्याला अक्कल लागते, पेटवायला नाही. जुळवायला अक्कल लागते, जाळायला नाही. सर्वांनी एकत्र येवून शांतता राखली पाहिजे. राज्य शांत राहिले पाहिजे, त्यासाठी मी पुढाकार घेतला. मी आजही राजीनामा द्यायला तयार आहे. कोणताही राजीनामा मागितला तरी मी द्यायला तयार आहे. राज्यात डोके फुटता कामा नये, यासाठी सर्वजण पुढे येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार सगळे पुढे येत आहेत. भविष्यात राज्य निश्चितपणे शांत होईल”, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफरवर भुजबळ काय म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीला सोडून आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. आपण अजित पवार यांचं राजकीय वर्चस्व पुन्हा निर्माण करुन देऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या ऑफरवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “निवडणुका जवळ आल्या की ऑफर येतात. मला तसे काहीही वाटत नाही. महायुतीत तीनही पक्ष एकत्र आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र लढणार आहेत”, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं.

महायुतीत आलबेल नाही? भुजबळ म्हणाले…
महायुतीत सारं काही आलबेल नाही, अशीदेखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “हवेत बार करणारे अनेक जण आहेत. कोणी सांगितलं? असं काहीही नाही. पाऊस पडेल की नाही, आज कसे भविष्य करणार? अशा वावड्या नेहमी उठत असतात. महायुती भक्कम आहे. महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. वावड्या उठविण्यात काही अर्थ नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button