संजय शिरसाट यांचा ठाकरे गटाला इशारा; म्हणाले, सर्वांना नग्न करून..
![Sanjay Shirsat's warning to Shiv Sena Thackeray group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/uddhav-thackeray-and-sanjay-shirsat-780x470.jpg)
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत नेतृत्व करावं, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिरसाट आणि फडणवीस यांना टोला लगावला होता. दरम्यान, यावरून शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कोणीतरी ऐरागैरा उठतो आणि देवेंद्र फडणवीसांची लायकी काढतो, असं संजय राऊत म्हणाले. यावरून आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी ऐरा गैरा असेन पण दलाल नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – सणासुदीचे दिवस डोळ्यासमोर ठेऊन पोस्टाने आणली आहे एक खास ऑफर
संजय शिरसाट म्हणाले, हे (ठाकरे गट) पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडणारे लोक आज मोदींबद्दल बोलत आहेत. मोदींच्या नखाचीसुद्धा लायकी नसणारे लोक आज या भाषेत बोलतात. त्यावरून खऱ्या अर्थाने यांची लायकी कळते. मोदी कुठे आणि यांची लायकी कुठे? त्यांचा जागतिक पातळीवर सन्मान केला जातो. हे टीनपाट लोक उठतात आणि मोदींबद्दल बोलू लागतात. नरेंद्र मोदी हे देशाचं नेतृत्व करतात. मोदींमध्ये जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, मला वाटतं. लायकी नसलेले लोक अशी वक्तव्ये करत असतात.
ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल त्यावेळी मी या सर्वांना नग्न करून टाकेन, थोडं थांबा, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू द्या. त्यांची परवानगी घेऊ द्या, मग यांच्याकडे पाहतो, असंही संजय शिरसाट म्हणाले.