इम्तियाज जलील यांना संजय शिरसाट यांचा टोला; म्हणाले, ‘बिर्याणी खाऊन..’
![Sanjay Shirsat said that Imtiaz Jalili protests by eating biryani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/imtiaz-jaleel-and-sanjay-shirsat--780x470.jpg)
औरंगाजेबानं संभाजी महाराजांचा छळ केला, त्याचं नाव आम्हाला कसं आवडेल?
मुंबई : औरंगाबाद नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यावरून वाद चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमनं साखळी उपोषणही सुरू केलं आहे. या उपोषणाचीही शहरात बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी एमआयएमच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. म्हणे आता बघू २४ च्या निवडणुकीत याचं काय करायचंय? अरे तुझ्या मतावर निवडूण आलो का? तू स्वत:चं सांभाळ ना. ज्या औरंगाजेबानं संभाजी महाराजांचा छळ केला, त्याचं नाव आम्हाला कसं आवडेल?, असं शिरसाट म्हणाले.
अमेरिकेनं लादेनला मारलं. सगळ्या जगाला माहितीये कसं मारलं. त्यांनी हा विचार केला नाही की देशात काय होईल जगात काय होईल. त्यांनी चिंता केली नाही. लोखंडाची पेटी केली, त्याला सळ्या लावल्या. हेलिकॉप्टरने समुद्रात सोडून दिलं. आहे का त्या लादेनची कुठे कबर? झाला का त्यावरून देशात उठाव? कुणी बेललं का?, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.
इम्तियाज जलील यांचं उपोषण बिर्यानी खाऊन चालू असल्याचं संजय शिरसाट म्हणाले, तो सकाळी १२ वाजेपर्यंत उठत नाही. आम्ही सकाळी त्याच्याकडे गेलो उपोषणाच्या दिवशी. त्याच्या माणसाला विचारलं, साहेब है क्या? तो म्हणे उपोषण को जाना है, साहब खाना खा रहे है. म्हटलं हे वेगळ्याच प्रकारचं उपोषण आहे. आम्ही पाहिलं तर ते तिथे बिर्याणी खात आहेत. हे जगातलं पहिलं बिर्याणीसहित उपोषण असेल, असंही शिरसाट म्हणाले.