युद्धविरामाची चर्चा पाकमध्ये होणं हे मोदींचं अपयश; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे समर्थन करत भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इराणसारखा देश अमेरिका आणि इस्रायलसारख्या शक्तिशाली देशांना शरण गेला नाही आणि ३५ दिवसांहून अधिक काळ त्यांना झुंजवत ठेवले, असे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत पुढे म्हणाले, युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला मिळालं, पाकिस्तान पुन्हा जगाच्या नकाशावर आला. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला हवं होतं. हे श्रेय महाविश्वगुरुंना मिळायला हवं होतं की आम्ही युद्ध थांबवलं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचे नेत्यानाहू यांना एका मंचावर आणलं. हे श्रेय महाविश्वगुरुंना मिळायला हवं होतं. पण तसं घडलं नाही कारण महाविश्वगुरुंकडे कुठली भूमिकाच नाही. जगात युद्ध सुरु आहे आणि आपले विश्वगुरु केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या ठिकाणी राजकीय विरोधकांवर शब्दांचे बॉम्ब टाकत होते. यांची हत्यारं काय? निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचं काम महाविश्वगुरु करत होते.
हेही वाचा : आरबीआयचा रेपो दर ‘जैसे थे’; गृहकर्ज स्वस्त की महाग?
इराण-अमेरिकेचं युद्ध थांबवण्याचं श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतलं. शांततेच्या संदर्भातली बैठक इस्लामाबादला होणार आहे. जे इस्लामाबाद ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात, भाजपाचा झेंडा फडकवणार होतात तिथे आता ट्रम्प, नेत्यानाहू, इराणचे नेते बसून शांती चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आणि भारतासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे मिळाली त्याला जबाबदार मोदी आहेत. डोनाल्ड पाकिस्तान आणि चीनला थँक्यू म्हणत असतील तर भारताला आणि मोदींना मारलेली ही चपराक आहे. मोदींनी आता सत्तेवर राहता कामा नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भारताची अवस्था मोदींमुळे डरपोक उंदराप्रमाणे झाली आहे. इतक्या मोठ्या घडामोडी घडत होत्या आणि भारताचे पंतप्रधान टेलिफोन ऑपरेटरचं काम करत होते. जॉर्डनच्या राजाशी बोलले, सौदी अरेबियातल्या नेत्यांशी बोलले, दुबईतल्या शेखशी बोलली, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलले, युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला मिळालं. याच्यावर तरी मोदींनी बोलावं अशी आमची अपेक्षा आहे. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख दलाल राष्ट्र असा केला होता. त्याच पाकिस्तानला युद्ध थांबवण्यासाठीचं श्रेय ट्रम्प यांनी दिलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.





