छापखान्यातून गायब झालेले ८८ हजार कोटी महाराष्ट्रातील खेळासाठी वापरले का? संजय राऊतांचा सवाल
![Sanjay Raut said whether the 88 thousand crores that disappeared from the printing house were used for sports in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई : शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन आहे. वर्धापन दिन होण्यापुर्वी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच २०१६ मध्ये छापलेल्या तब्बल ८८ हजार कोटी रूपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप होत आहे. यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुंबईत लुटालुट चालली आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत लुट सुरू आहे. या लुटीच्या कथा ऐकून दोन ओळी सुचतात. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने चुना लगाके पुरा देश डुबाने’ जसे हे दोन मस्ताने दिल्लीत आहेत तसे महाराष्ट्रात देखील आहेत. जे महाराष्ट्र, मुंबई लुटतायेत.
हेही वाचा – ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत’; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
नाशिक, बंगळुरू आणि देवस मध्यप्रदेश येथे नोटा छापण्याचे सरकारचे कारखाने आहेत. तेथून ८८ हजार कोटी रूपयांच्या नोटा गायब झाल्या. छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले हे ट्रक गेले कुठे? ८८ हजार कोटी रूपये नाशिक, देवास आणि बंगळूरू या तीन नोटा छापण्याच्या कारखान्यातून गायब होतात, मग मी असं म्हणतो आमच्या महाराष्ट्रात जो खेळ झाला त्यासाठी हे पैसे वापरले नाहीत ना? आजही याला फोट त्याला फोड हा खेळ चालू आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान,नाशिक, देवास आणि बंगळूरू येथील सरकारी छापखान्यातून ५०० रुपयांच्या अब्जावधी मुल्याच्या नोटा गायब झाल्या आहेत. आरबीआयच्या २०१६-१७ आर्थिक वर्षाच्याअहवालातही नोटा गायब झाल्याचा उल्लेख आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी ७, २६० दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचल्याच नाहीत. गायब झालेल्या ५०० रुपयांच्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या आहेत. या नोटांचं एकत्रित मूल्य तब्बल ८८ हजार कोटी रुपये इतके आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.