खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का? संजय राऊतांचा सवाल
![Sanjay Raut said whether MPs can submit their resignations to the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Sanjay-Raut-3-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आमदार आणि खासदारांच्या घरावरील हल्ले सुरू असताना शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहीत राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाच्या खासदारांनी ढोंग करू नये. ही सगळी भाजपाची पिल्लावळ आहे. त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. कालच एका राजीनामा दिलेल्या खासदारांना नारंगी सदरा घालून ‘कॅनॉट प्लेस’मध्ये मस्तपैकी फिरताना पाहिलं. हे सगळे मस्तवाल लोक आहेत. ढोंग करतायत. लबाड लांडगं ढोंग करतंय, अशी स्थिती आहे.
हेही वाचा – मुकेश अंबानींना जीवे मारण्याची तिसरी धमकी, ४०० कोटींच्या खंडणीची मागणी!
खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का? खरं म्हणजे आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांच्या राज्यात हिंसाचार होतोय. भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना यासाठी मुख्यमंत्री केलं, काय तर म्हणे मराठा ‘फेस’ (चेहरा) आहे, इथे मराठ्यांच्या तोंडाला फेस आलाय. मराठा मरतोय. मराठा जळतोय. एक मराठा मुख्यमंत्री अपयशी ठरतोय, हा कसला ‘फेस’ आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी २०२४ च्या निवडणुकीत पूर्णपणे पराभूत होणार आहे. त्याचं श्रेय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन मराठा नेत्यांना जाईल, असंही संजय राऊत म्हणाले.