‘चिंचवडचा विजय हा भाजपचा नाही तर तो विजय जगताप पॅटर्नचा’; संजय राऊत

कसबा तो झांकी हौ महाराष्ट्र अभी बाकी है
पुणे : महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्याने कसबा मतदारसंघात विजय झाला. एक जण बाजूला जाऊन उभे राहिल्यामुळे चिंचवडचा असा निकाल आला आहे. कसब्याचा लागलेला निकाल हा महाराष्ट्र राज्याच्या येणाऱ्या भविष्याच्या निवडणुकीचे मार्गदर्शन आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते सध्या पुणे दौऱ्यावर आहेत.
महाविकास आघाडी अशीच सोबत राहिली तर २०२४ मध्ये २०० पेक्षा अधिक उमेदवार विधानसभेत असतील. प्रदर्शन विकृती होऊनही पुण्यातील सुजाण नागरिकांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे. कायदा, न्यायालय ही पाकिटाखाली अजून चिरडली गेलेली नाहीयेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी मागणी केली तरी तसे काही होणार नाही या उलट त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे, असं संजय राऊत म्हणाले.
चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपाचा विजय आहे. हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो. हा विजय जगताप पॅटर्नचा असल्याचे संजय राऊत म्हणाले. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता, असंही राऊत म्हणाले.





