‘राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू’; शीतल म्हात्रे प्रकरणावरून संजय राऊतांची खोचक टीका
![Sanjay Raut said that the movie 'Muka Ghya Muka' is currently being released in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/shital-mhatre-and-sanjay-raut-780x470.jpg)
दादा कोंडकेंनी त्यावर सिनेमाच काढला असता
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात चांगलाच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी शिवसेनेतील ठाकरे गाटाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे. दादा कोंडके हवे होते. त्यांचा ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा खूप गाजला होता. पण, ‘मुका घ्या मुका’ प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे? त्यांचा संबंध काय? हा सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सुटणार नाही, अशी कलम दाखल करण्यात येत आहेत. आम्ही सांगितलं होतं का मुका घ्यायला. मुळात तो व्हीडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊद्या. मॉर्फींगचा विषय नंतर येईल. मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही, असं संजय राऊत म्हणाले.
मला असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोन येत आहेत. आमच्या घरी आणि कार्यालयात पोलीस आलेत. हा काय प्रकार चालू आहे. मुळात तो व्हिडीओ संबंधित आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक केली का? मग कोणाची बदनामी करत आहात. ही तुमच्या गटातील अंतर्गत भांडण असतील, तर ती तुम्ही मिटवा, शिवसेनेला लक्ष्य करू नका, असं राऊत म्हणाले.
याप्रकरणात प्रकाश सुर्वेंनी समोर आलं पाहिजे. मुका घेणारे पाहिले गुन्हेगार ते आहेत. दादा कोंडकेंनी त्यावर सिनेमाच काढला असता. आता शिंदे गट नव्याने सिनेमा सुरू करणार असेल, तर हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत असाल, तर पहिला गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.