काँग्रेस विधानसभेला एकटी लढणार? संजय राऊतांचं सूचक विधान; म्हणाले..
![Sanjay Raut said that since the confidence of Congress has increased, they will not fight alone](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Nana-Patole-and-Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी महाविकास आघाडीत विधानासभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेसने अधिक जागांची मागणी केली असल्याची चर्चा आहे. तसेच, मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळावं अशी इच्छा काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
खासदार संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आमचा सर्वांचाच आत्मविश्वास वाढला आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत आत्मविश्वास मिळावा यासाठी एकत्र काम करावे लागेल. तिन्ही पक्षांना एकत्र राहावं लागेल आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाहीत. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? आत्मविश्वास वाढला आहे असं कोणाला वाटत असेल तर तो आत्मविश्वास कोणाचा आहे? कशामुळे आहे? कसा आहे? हा अभ्यासाचा विषय आहे.
हेही वाचा – राष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडची ओळख ‘मेट्रो सिटी’
तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीचं जागावाटप खूप सोपं होतं. कारण तेव्हा फक्त ४८ जागांचा विचार आम्ही करत होतो. परंतु, आता विधानसभा निवडणुकीला आम्हाला २८८ जागांचं वाटप करायचं आहे. महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. तसेच आमचे लहान मित्रपक्ष देखील आहेत. त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमच्या मित्रपक्षांना देखील महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही त्यात नक्कीच यशस्वी होऊ, असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू. कोणाला खुमखुमी असेल की लहान भाऊ, मोठा भाऊ, लाडका भाऊ तर महाराष्ट्रात काय चित्र आहे हे भविष्यात कळेल. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. काँग्रेसला लोकसभेत जागा जास्त मिळाल्या. पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे, असंही संजय राऊत म्हणाले.