‘मनसेच्या वाट्याला गेलात आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं’; राज ठाकरेंच्या टोल्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर
![Sanjay Raut said that Shiv Sena has never left Hinduism](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/raj-thackeray-and-sanjay-raut-780x470.jpg)
शिवसेनेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नाही
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मशिदीवरूल भोंग्यांच्या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर हजारो केसेस दाखल केल्या आणि नंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कुणी कुणाच्या वाट्याला गेलेलं नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार किंवा मुख्यमंत्रीपद का गेलं हे आख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके, असं संजय राऊत म्हणाले.
ईडी काय आहे हे काही मी मनसे प्रमुखांना वेगळं सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त इडीचा अनुभव आम्ही घेऊनही आमच्या तोफा आणि कार्य चालू आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नाही. कोण काय म्हणतं त्यावरून शिवसेनेची भूमिका ठरत नाही. तुम्ही तुमचं काम करा. शिवसेनेनं नेहमी महाराष्ट्राती अस्मिता आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी आपल्यासोबत ठेवल्या आहेत. हिंदुत्वावर शिवसेनेनं कधीही तडजोड केलेली नाही हे सगळ्यांना माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.