हक्कभंगाच्या नोटिशीली संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले,..
![Sanjay Raut said that my statement is limited to a specific group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/sanjay-raut-2-780x470.jpg)
माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. पण नोटिशीची मुदत संपूनही राऊत यांनी उत्तर दाखल केलं नव्हतं. आज संजय राऊत यांनी नोटिशिला उत्तर दिलेलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे की, कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधानमंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला ३ मार्च २०२३ पर्यंत सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मुदत दिली.
मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. ४ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी.
महाराष्ट्र विधानमंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वत: अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे. तरीही या प्रकारणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतबाढ द्यावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.