‘एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी’; संजय राऊतांची खोचक टीका
![Sanjay Raut said that Eknath Shinde's Shiv Sena is money laundering](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Sanjay-Raut-1-1-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी जे आव्हान दिलंय की जनतेत येऊन सांगा शिवसेना कुणाची ते अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांनी स्वीकारलं पाहिजे. हिंमत असेल तर जनतेसमोर या, त्यानंतर जो निकाल आहे तो छातीठोकपणे सांगा. तसंच आम्ही जेव्हा पुरावे दाखवले तेव्हा राहुल नार्वेकर बिन काचेचा गॉगल लावून बसले होते का? असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा – ‘न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांकडून अन्याय’; जितेंद्र आव्हाडांचं विधान चर्चेत
जनता न्यायालयाच्या स्क्रिनवर आम्ही सगळे पुरावे दाखवले आहेत. त्यावेळी राहुल नार्वेकर हे बिन भोकांचा चश्मा लावून बसले असतील त्यामुळे त्यांना दिसलं नसेल. सध्या २०२४ हे वर्ष सुरु झालंय. पुढचे सहा महिने भाजपा टिकली तर मी रामाला अभिषेक करेन, असं संजय राऊत म्हणाले.
लोकसभेच्या मुंबईतल्या दोन जागा शिंदे गट लढवेल ती पण कमळाच्या चिन्हावर लढवणार आहे असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शिवसेनाच नाही. तो सगळा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. शिवसेना आम्ही आहोत. आम्ही २३ जागा लढतो आहोत. आमची शिवसेना खरी शिवसेना आहे. आत्ताची शिवसेना म्हणजे पाकिटमारी आहे. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं हे फार काळ टिकणार नाही. मुंबईतल्या शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योजक ठरवतील, असंही संजय राऊत म्हणाले.