‘शिंदे सभेसाठी ३०० रूपये ते ५०० रूपये रोजावर माणसं आणतात’; संजय राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या या सभेमुळे लोकांची हातभर फाटली आहे
![Sanjay Raut said that Eknath Shinde brings people between Rs 300 and Rs 500 per day for the meeting.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Sanjay-Raut-4-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातल्या सभेबद्दल देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि उत्सुकता आहे. देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत उद्धव ठाकरे का बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही सभा रेकॉर्डब्रेक हा शब्दही कमी पडेल इतकी मोठी होईल, असं संजय राऊत म्हणाले.
या सभेला कोणी भाड्याने माणसं आणणार नाही. तिकडे सभेसाठी ३०० रूपये ते ५०० रूपये रोजावर माणसं आणली जातात. पण मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात. या लोकांना समोर कोण बोलत आहे याची माहिती नसते. उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. अनेक संस्थांनी यासाठी सुट्ट्या दिल्या आहेत, कामं थांबवली आहेत. लोकांना सभेले येता यावं लोकांना सुट्ट्या दिल्या आहेत. कारण ही सभा महाराष्ट्राला दिशा देणारी असेल. शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार आणि महिलांसह सर्वांनी या सभेला यावं, उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकावे, असं संजय राऊत म्हणाले.
माझ्या भाषेत मी म्हणेन, उद्धव ठाकरेंच्या या सभेमुळे लोकांची हातभर फाटली आहे. पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना रस्ता बदलण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरे रस्ता बदलणार नाहीत. आम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.