संकेत बानकुळेंच्या बिलमध्ये बीफ कटलेटचा उल्लेख; संजय राऊतांचा मोठा दावा
![Sanjay Raut said that beef cutlet is mentioned in the bill of Sanket Bankule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्या चारचाकी वाहनाची तपासणी केल्याची माहिती आहे. या वाहनात बऱ्याच धक्कादायक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्याऑडी कारने नागपुरात पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीमध्ये एक लाहोरी बारचे बील मिळाले आहे. बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याचे मित्र ज्या बारमधून बाहेर पडले तिथल्या खाण्या-पिण्याचे हे बील आहे. या बीलवर दारू, चिकन, मटणसह बीफ (गोमांस) कटलेटचाही उल्लेख आहे. श्रावण, गणपती आहे असे म्हणत हिंदूत्व शिकवणाऱ्या लोकांनीच बीफ कटलेट खाल्ले असून हीच लोक या मुद्द्यावरून मॉब लिचिंगही करतात. पोलिसांनी हे बील जप्त केलेले असून तुम्ही बीफ खायचे अन् रस्त्यावर, रेल्वेमध्ये मॉब लिचिंग करायचे. वा रे हिंदूत्व. तुम्ही काय आम्हाला हिंदूत्व शिकवणार.
हेही वाचा – आमच्या मर्यादेचा अंत पाहू नका; अजित पवार गटाचा शिंदे गटाला इशारा
ज्या प्रकारे फडणवीस गृहखाते चालवत आहेत, त्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. चार वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात ते अनिल देशमुख यांना अटक करायला निघालेले आहेत. पण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्याच पक्षाच्या नेत्याच्या मुलाने दारू पिऊन गाड्या उडवत लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला मात्र अभय दिले जात आहे. कुठे फेडाल हे पाप? असा सवाल तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यात हिंमत असेल आणि त्या स्वत:ला कायद्याच्या रक्षक समजत असेल तर त्यांनी हे बील लोकांसमोर आणावे, असं संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात केली जाईल. महाराष्ट्राला एवढा बेकार गृहमंत्री कधी लाभला नव्हता. नागपुरात त्यांच्या नाकासमोर एवढा मोठा अपघात झाला, १७-१८ लोकं रुग्णालयात आहेत आणि ज्याच्या मालकीचे वाहन आहे त्याचे नाव साधे एफआयआरमध्येही नाही. जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवर होती आणि नंतर बदलण्यात आली त्याला वाचवले जात आहे, असंही संजय राऊत म्हणाले.