‘अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे’; संजय राऊतांची मागणी

मुंबई | लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होतं, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, लाडकी बहीण योजनेत अपात्र बहिणींना लाभ दिला असं अजित पवार म्हणत असतील तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून राजीनामा दिला पाहिजे. अर्थखात्यातून घोटाळा झाला आहे. या राज्याचे पैसे लुटले कुणी? लाडक्या बहिणींनी नाही तर लाडकी भावांनी नावं बदलून हा लाभ घेतला आहे. शेकडो कोटी रुपयांचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला, तुम्ही छाननी केली नाहीत कारण तेव्हा तुम्हाला मतं हवी होती. अर्थ खात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली. याचं प्रायश्चित्त अजित पवारांनी राजीनामा देऊन घेतलं पाहिजे आशी मागणी संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा : जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या राज्यातल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांविषयी किती गांभीर्य आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती गांभीर्य आहे? याबाबत त्यांनी चिंतन बैठक घेतली पाहिजे. मला सांगा एकनाथ शिंदे यांना राज्याच्या कुठल्या प्रश्नावर किती गांभीर्य आहे? राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर किंवा समस्यांवर त्यांनी काम केलं आहे? टेंडर काढणं, ठेकेदारांकडून पैसे घेणं आणि पक्ष फोडणं, माणसं फोडणं हेच चाललं आहे. एकनाथ शिंदेंप्रमाणेच अजित पवारही हेच करत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हेच करत आहेत. राज्याला प्रतिष्ठा कोण प्राप्त करु देणार? मुख्यमंत्री लग्न सोहळ्यात आहेत. आधी कुंभमेळ्याच्या बैठका झाल्या आता लग्न सोहळे होतील, असा टोलाही संजय राऊत यांनी राज्य सरकारला लगावला आहे.