ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

आमचे उद्योग गुजरातला का पळवले? आमच्या पोरांना बेरोजगार का ठेवले? या प्रश्नांचे उत्तर द्यावे

महाराष्ट्र : इतर पक्षांतले सर्व भ्रष्टाचारी ईडी, सीबीआयचे आरोपी, मनी लाँडरिंगवाले हे भाजपात सामील झाले आहेत. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे. संविधान, कायदा, न्यायालये आपल्या स्वार्थासाठी हवी तशी मोडून ठेवली, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी घणाघात केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक, पंतप्रधान मोदींची सभा आणि त्यांच्या सभेतील मुद्दे यावरुन त्यांनी टीका केली. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा गर्जना करणे सत्ताधारी पक्ष व त्यांच्या नेत्यांना शोभत नाही. आपण एकाच राज्याचे व एकाच धर्माचे पंतप्रधान आहोत अशा आवेशात मोदी वागत असतील तर ते बरे नाही. महाराष्ट्रासारखे एकेकाळचे बलवान राज्य त्यांनी कमजोर करून ठेवले व पिचक्या पाठकण्याचे लोक त्यासाठी सत्तेवर आणले. हा एक प्रकारे महाराष्ट्रद्रोहच आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्यावर मोदी यांचा भर आहे व त्यासाठीच ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ची घोषणा ते देतात, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारी लवाजम्यासह सध्या महाराष्ट्रातील प्रचार कार्यात गुंतले आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने एक तर प्रचारात फार अडकू नये. पंतप्रधान हे एखाद्या पक्षाचे नसतात. विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांच्या प्रचारातही अलीकडे आपले पंतप्रधान वारंवार दिसत आहेत. त्यामुळे पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरसिंह राव यांच्यासारख्या नेत्यांनी पंतप्रधान पदास जी उंची गाठून दिली ती खाली आली, अशी टीका संजय राऊतांनी केली.

पुन्हा पंतप्रधानांनी अशा प्रचार सभेत करावयाच्या भाषणांबाबतही काही संकेत आहेत. पंतप्रधानांनी संयमाने बोलावे अशी परंपरा आहे, पण भाजपचे पंतप्रधान मोदी यांनी सर्व संकेत, पदाची प्रतिष्ठा खालच्या पातळीवर आणली. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, ‘देशद्रोही’ वगैरे विषय राज्याच्या निवडणुकीत त्यांनी आणले आहेत. ‘काही देशद्रोही घटक त्यांच्या स्वार्थापोटी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांनी त्यांचा पराभव करावा’, असे श्री. मोदी यांनी जाहीरपणे सांगितले. महाराष्ट्रातील सभेतून ते अशी मुक्ताफळे उधळतात तेव्हा आश्चर्य वाटते. अधूनमधून ते हिंदुत्वाची पुडी सोडतात. लवकरच ट्रम्प, युक्रेन युद्धाचाही प्रवेश त्यांच्या प्रचारसभेत होईल. कश्मीर, 370 कलम याबाबत काँग्रेसकडून कसा विरोध झाला याबाबत पंतप्रधानांची भाषणे सुरू आहेत. मोदी हे भान सुटल्याप्रमाणे बोलतात व त्यांचे भक्त टाळ्या वाजवून फेकुगिरीस प्रोत्साहन देतात असे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.

महाराष्ट्रात भ्रष्टाचार, देशद्रोह वगैरेंचा मुद्दा पंतप्रधानांनी आणला, पण मोदी यांनी हे भ्रष्टाचारी व देशद्रोही कोण याबाबत खुलासा का करू नये? इतर पक्षांतले सर्व भ्रष्टाचारी ईडी, सीबीआयचे आरोपी, मनी लाँडरिंगवाले हे भाजपात सामील झाले आहेत. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना श्री. मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे. संविधान, कायदा, न्यायालये आपल्या स्वार्थासाठी हवी तशी मोडून ठेवली. देश एखाद्या व्यापाऱ्यासारखा चालवून मोदी यांनी सर्व सार्वजनिक संपत्ती आपल्या एकाच उद्योगपती मित्राच्या हवाली केली. हे काय देशभक्तीचे लक्षण झाले? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

निवडणूक प्रचारातील मनमोहन सिंग यांच्या भाषणांचा अभ्यास मोदी यांनी केला पाहिजे. पंडित नेहरू वगैरे तर त्यांच्या कल्पनेपलीकडचे आहेत. मोदी ज्या पद्धतीने निवडणूक प्रचारात भाषणे ठोकत असतात त्यावरून खऱ्याची दुनिया राहिलेली नाही हे पटायला लागले आहे. समाजाचे विभाजन करण्याची भाषा पंतप्रधानांकडून होत असेल तर भारताचा निवडणूक आयोग चिरुट फुंकत धुराची वलये सोडीत बसला आहे काय? 370 कलमाचा विषय महाराष्ट्राच्या व झारखंडच्या निवडणुकीत आणायचे कारण नाही. 370 कलम हा आता त्या राज्याचा विषय आहे. शिवसेनेने तर 370 कलम हटवताना संसदेत विरोध केला नाही. तरीही मोदी महाराष्ट्रात 370 कलमाचा बुलबुलतरंग वाजवीत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

महाराष्ट्रात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तो मोदींच्या धोरणांमुळे. महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवून मोदी यांनी मराठी तरुणांच्या पोटावर लाथ मारली. 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा आमचे उद्योग गुजरातला का पळवले? आमच्या पोरांना बेरोजगार का ठेवले? या प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी महाराष्ट्राला द्यावीत, पण मोदी हे भलतेच विषय घेऊन बोलत आहेत. यालाच बनवाबनवी म्हणतात!, असेही संजय राऊत म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button