“तीन वर्ष तारीख पे तारीख!” सरन्यायाधीश यांच्या शिंदेंबरोबरच्या फोटोवर संजय राऊतांचा टोला

मुंबई | २०२२ साली महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे स्थित्यंतर घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करत वेगळा गट स्थापन केला आणि आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले. या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर गेली तीन ते चार वर्षे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी या आठवड्यात होण्याची शक्यता होती. मात्र, ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर तिरकस टीका केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे नुकतेच एका विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्वागतावेळी भाजपाचे मंत्रीही उपस्थित होते. या भेटीचे फोटो एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पोस्ट केले आहेत.
हेही वाचा : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट, अर्जात चूक झाली तर..

या फोटोवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची पोस्ट रिशेअर करत, “म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” असे एका ओळीचे कॅप्शन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना प्रकरणाची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. राऊत यांच्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले असून, न्यायालयीन प्रक्रियेवर अप्रत्यक्ष टीका केल्याचा आरोपही त्यांच्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




