‘मी लोकसभा निवडणूक लढवणार होतो, पण..’; संभाजीराजे नेमके काय म्हणाले?
![Sambhaji Raje Chhatrapati said that we will win the entire Kolhapur constituency for Shahu Maharaj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Sambhaji-Raje-Chhatrapati-780x470.jpg)
पुणे | कोल्हापूरचे शाहू महाराज द्वितीय यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाहू महाराज कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेला उभे राहणार असल्याची चर्चा आहे. शाहू महाराजांचे पुत्र, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माझ्या वडिलांनी लोकसभेला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं ते म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढवणार होतो. माझं तसं ठरलं होतं. मी कोल्हापूर किंवा नाशिक मतदारसंघाचा विचार करत होतो. परंतु, माझ्या वडिलांनी निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केल्यावर माझा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उरत नाही. माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना तयारी करण्यास सांगितलं आहे. मी ही निवडणूक लढवली असती तर माझं शंभर टक्के योगदान दिलं असतं. आता महाराज लढणार आहेत म्हटल्यावर महाराजांसाठी आम्ही १००० टक्के योगदान देऊ.
हेही वाचा – जागावाटपावरुन महाविकास आघाडीत वाद? प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
- शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, शाहू महारांजांची भूमिका मी मांडू शकत नाही. त्यांची भूमिका तेच स्पष्ट करतील. तसेच कोल्हापूरच्या जनतेलाही महाराज हवे आहेत. महाराज प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, त्यांच्या उमेदवारीबाबत मविआ नेते काय निर्णय घेणार आणि महाराजांची भूमिका काय असेल ते आपल्याला लवकरच कळेल. मविआचे नेते आणि महाराज योग्य वेळी सर्व गोष्टी स्पष्ट करतील.
शाहू महाराजांसाठी आम्ही संपूर्ण कोल्हापूर मतदारसंघ पिंजून काढू. कोल्हापूर हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. हाच विचार देशभर जावा अशी महाराजांची इच्छा आहे. आम्ही त्यासाठी सर्व प्रकारची मेहनत घेऊ, असंही संभाजीराजे म्हणाले.