breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘मुंबई महापालिकेवर भगवा फडकविणार’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मविश्वास

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली असली तरी महायुतीला मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मते जास्त मिळाली आहेत. त्यामुळे कधीही निवडणूक झाली, तरी मुंबई महापालिकेवर आपला भगवा झेंडा फडकेल आणि विधानसभा निवडणुकीतही जागा वाढतील, असा आत्मविश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील विजय आभासी असल्याची टिप्पणी फडणवीस यांनी केली.

मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारासाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आदी उपस्थित होते.

भाजपला निवडणुकीत झालेले मतदान मोसमी पावसासारखेच आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह चार राज्यांत कमी पडला. ओरिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात जास्त पडला व जनतेने भाजपला भरभरून मते दिली. संविधान बदलणार, या खोट्या प्रचारामुळे देशात ७६ व महाराष्ट्रात १३ जागा कमी मिळाल्या. महाविकास आघाडीपेक्षा ०.३० टक्के मते कमी मिळाल्याने निवडणुकीचे अंकगणित बिघडले व अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठी मते मिळालेली नसून आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेतून केवळ सहा हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. ठाकरे यांनी गेली दीड वर्षे तमाम हिंदू भगिनी, बंधू व मातांनो असा भाषणात उल्लेख करणे सोडून दिले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब ठाकरे केला गेला, गेले चार महिने ज्यांचे पाय पकडत होते, त्यांची मते ठाकरे गटाच्या उमेदवारांना मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला आभासी विजय मिळाला आहे. पण इतिहासातून शिकायचे असते व पुढे जायचे असते, असे फडणवीस यांनी नमूद केले.

हेही वाचा – ‘चिंचवडची जागा मीच लढणार’; अश्विनी जगताप ठाम

ज्येष्ठ भाजप नेते मधू देवळेकर हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून येत होते. ही भाजपची जागा अनेक वर्षे मित्रपक्षाला दिली होती. पण आता ती परत मिळविली असून खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी या जागेवर विजय मिळविणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

भाजपच्या संघटनात्मक पातळीवर शुक्रवारी चार महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या असून एका बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा आणि अन्य बैठकांमध्ये विधानसभा निवडणूक तयारी व रणनीती ठरविण्यात येणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय सहसरचिटणीस मंत्री शिवप्रकाश हे निवडक प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, सुकाणू समिती सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, आमदार, खासदार व अन्य नेते या बैठकांसाठी उपस्थित राहणार आहेत. आमदार व बूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button