रूपाली चाकणकर फरार; रूपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ

पुणे | अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे. महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खरात याच्यासोबत चाकणकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच त्या खरातच्या संस्थेत संचालक असल्याचेही समोर आल्याने विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वाद अधिकच चिघळला आहे. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फरार, बजाव टाळी,” अशी उपरोधिक पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरच्या मल्लांची दमदार कामगिरी; गादी विभागात पुण्याचा दबदबा

महिलांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चाकणकर या या प्रकरणात शांत असल्याचा आरोप करत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवून या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“अभी बात निकली है तो बहुत दूर तक जाएगी… संविधानिक पदावर असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा अत्याचाराच्या प्रकरणात गुंतल्या आहेत,” अशा आशयाची आणखी एक पोस्ट करत पाटील यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, या आरोपांवर रूपाली चाकणकर यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





