रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा; म्हणाले..
मुंबई | विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलं जातंय. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंना गुंड भेटतात. देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात. अजितदादांना गुंड भेटतात. मग लोकसभेला गुंडाचा वापर करणार आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार म्हणाले की, मला वाईट याचं वाटतं की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच गुंडांना भेटत असावेत. आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलं आहे. ही तुमची वृत्ती आहे. भाजपाच्या जवळ गेल्यानंतर दादांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही गुंडांचा वापर करणार? असं ते म्हणाले.
हेही वाचा – लोकसभा निवडणूक : शिरुरची जागा राष्ट्रवादी अजित पवारांकडे; वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक!
एसआयटीचा मुद्दा कोणी मांडला? भाजपाच्या आमदाराने मांडला. एसआयटी कोणी गठीत केली? तर एसआयटी भाजपाच्या अध्यक्षांनी गठीत केली. अशा परिस्थिती टार्गेट कोणाला प्रयत्न केला जातोय? त्यामुळे भाजपाचे टार्गेट एकनाथ शिंदे नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय, असंही रोहित पवार म्हणाले.