लंके-मारणे भेटीवर रोहित पवारांनी मागितली माफी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-27-780x470.jpg)
Rohit Pawar : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला. त्यामुळे निलेश लंकेंवर चौफेर टीका सुरु झालीये. लोकसभा निवडणुकीत गजा मारणेने मदत केली, त्याचे आभार मानायला ही भेट होती का? अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. त्यांनंतर निलेश लंके यांनीही स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता आमदार रोहित पवारांनी माफी मागितली आहे.
रोहित पवार म्हणाले, आहिल्यानगरचा आमदार म्हणून आणि निलेश भाऊंच्या प्रचारात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून सांगतो की, जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी देखील माफी मागितली आहे. त्यांना त्याच्याबाबत माहिती नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा. कारण त्यांना लोक फॉलो करत असतात. जसं निलेश भाऊंनी माफी तसंच मी सुद्धा माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेला. कृपा करुन याच्यावर कोणही राजकारण करु, अशी विनंती आहे.
हेही वाचा – रस्ते, पाणी अन् कचरा समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा!
गजा मारणेकडून सत्कार स्वीकारल्यानंतर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर निलेश लंके म्हणाले, गजा मारणे याच्याशी झालेली भेट ही केवळ अपघात होता. मला गजा मारणे यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती.
गजा मारणे पुण्याती कुख्यात गुंड आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांचा खून झाला होता, या प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती. त्यामुळे तो 3 वर्षे येरवडा कारागृहात होता. मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गजा मारणेची ओळख बनली आहे. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.