Republic Day 2026: कर्तव्य पथावर शक्तिप्रदर्शनाचा ‘पॉवर शो’! पुष्पवृष्टी, मिसाईल्स आणि टँकांची थरारक झलक
कर्तव्य पथावर Mi-17 हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ध्वजारोहण केले आणि 21 तोफांची सलामी
Republic Day 2026 Parade: देशभरात आज 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. यावेळी राष्ट्रगीत झाले आणि परंपरेनुसार 21 तोफांची सलामी देण्यात आली.
युरोपियन संघाचे प्रमुख पाहुणे, उर्सुला यांची पोस्ट चर्चेत # Republic Day
यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडला युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, “प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. भारत हा जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित बनवत आहे.”
‘ऑपरेशन सिंदूर’चा झेंडा
कर्तव्य पथावर यावेळी स्वदेशी बनावटीच्या ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरचं खास प्रदर्शनही करण्यात आलं. हे हेलिकॉप्टर लांब पल्ल्याचे रडार आणि दिवस-रात्र काम करणाऱ्या कॅमेऱ्यांनी सज्ज आहेत. विशेष म्हणजे या हेलिकॉप्टरवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा ध्वज लावण्यात आला होता.
मिसाईल्सचा ‘पॉवर शो’ Republic Day
यंदाच्या परेडमध्ये भारताने आपल्या स्वदेशी संरक्षण क्षमतेवर भर देत सूर्यस्त्र आणि ब्रह्मोस या दोन महत्त्वाच्या क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन केलं. सूर्यस्त्र हे शत्रूच्या रडार प्रणाली शोधून त्यांना निष्क्रिय करण्यासाठी उपयुक्त मानलं जात असून त्यातून भारताची इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमता आणि हवाई संरक्षण अधिक मजबूत होत असल्याचा संदेश देण्यात आला.
परेडचं नेतृत्व लेफ्टिनेंट जनरल अवनीश कुमार यांनी केलं
कर्तव्य पथावरील या औपचारिक परेडचं नेतृत्व परेड कमांडर लेफ्टिनेंट जनरल अवनीश कुमार यांनी केलं. सजवलेल्या वाहनातून त्यांनी संचालन करत परेड अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली. देश-विदेशातील मान्यवर पाहुणे आणि हजारो नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.




