शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
![Rape case filed against former Shiv Sena minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Crime-Pune-780x470.jpg)
पुणे : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर पुण्यातील शासकीय विश्रामगृह आणि बिबेवाडीतील एका बंगल्यामध्ये अनैसर्गिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाजप शिवसेना युतीच्या काळामध्ये मंत्रिपद भूषविलेल्या उत्तम प्रकाश खंदारे या माजी मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंदारे हे भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये माजी सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री होते.
हा सर्व प्रकार २०१२ पासून आजपर्यंत घडला. या महिलेला त्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे (वय ६५, रा. सोलापूर), महादेव भोसले (सोलापूर), बंडू दशरथ गवळी (सोलापूर) आणि रूपाली शिंदे (सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आयपीसी ३७६, ३७७, ४०६, ४२०, ५०६, ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखविले तसेच तिला तिच्या मुलांचा सांभाळ करतो असे भासविले. तिला पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये तसेच बिबेवाडी येथील पोकळे वस्ती मध्ये असलेल्या बकुळ हॉल समोरील जाधव निवास बंगल्यामध्ये बोलावून घेतले. या ठिकाणी तिच्यासोबत बळजबरीने चाकूचा धाक दाखवीत अनैसर्गिक व नैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. या महिलेने त्याला नकार दिला असता तिला निर्वस्त्र करून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर देखील तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.