शिवसेना-भाजपत वादाची ठिणगी? रामदास कदम यांचा भाजप नेत्यांना गंभीर इशारा
![Ramdas Kadam said that BJP should not cut its throat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Ramdas-Kadam-780x470.jpg)
मुंबई | राज्यामध्ये ४८ पैकी सर्वाधिक जागा भाजपच लढणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या वाटेला १० पेक्षा कमी जागा देण्याचा अंदाज आहे. त्यावरून शिवसनेच्या गोटात संतापाचं वातावरण असल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीदेखील भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, त्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. आपल्यातील संबंधांबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे.
हेही वाचा – पुण्यातील खडकवासला परिसरात जमावाचा धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला, व्हिडीओ व्हायरल
२००९ मध्ये आमची (संयुक्त शिवसेना) आणि भाजपाची युती असूनही भाजपाने मला गुहागरच्या विधानसभा निवडणुकीत पाडलं हे वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं केली जात आहेत. स्थानिक आमदाराला त्रास देतायत, हे सगळं हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे, असं रामदास कदम म्हणाले.
आम्ही (शिंदे गट) मोदी आणि शाहांकडे बघून इथे (एनडीए) आलो आहोत. मागील निवडणुकीत काय झालं याची मला माहिती नाही. परंतु, पुन्हा एकदा आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा, असंही रामदास कदम म्हणाले.