शरद पवारांच्या नावावरून विधानसभेत खडाजंगी; राम कदम, आशिष शेलारांचे गंभीर आरोप
![Ram Kadam's serious allegations against Rohit Pawar and Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ram-Kadam-and-Ashish-Shelar-780x470.jpg)
मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यावरून आज विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार राम कदम यांनी आज विधानसभेत बोलताना आमदार रोहित पवार व शरद पवार यांची नावं घेत गंभीर आरोप केले.
राम कदम म्हणाले की, सांताक्रूज पोलीस स्थानकात २७ तारखेला अजय पनवेलकर यांनी तक्रार केली. एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र दिसत आहे. व्हिडीओत एक इसम म्हणतो की, देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राम्हण आम्ही संपवून टाकू. याचं नाव आहे योगेश सावंत. याचे सबंध बारामतीहून आहे. तिथल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार व शरद पवारांचा नातू रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो. काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत, असा आरोप राम कदम यांनी केला.
हेही वाचा – Pimpri Chinchwad | हिंडवडी परिसरातील दोन हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई
राम कदम यांच्या या आरोपानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. कोणतीही सूचना न देता सभागृहात रोहित पवार व शरद पवारांचं नाव घेतलं गेलं. असे शब्द कोणत्याही समाजाबाबत करण्याला कुणीही पाठिशी घालणार नाही. पण सभागृहात कुणाचंही नाव घेताना नोटीस देण्यात आली होती का? शरद पवारांचं नाव घेतलं गेलं, त्यासंदर्भात नोटीस दिली होती का? असंच एखाद्या नेत्याचं नाव कसं घेता येईल? नावं घेतली असतील तर ती कामकाजातून काढून टाका, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आगपाखड केली. किती जातीवादी असता येईल, याचा हा कळस आहे. एक समाज तीन मिनिटांत संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू, असं म्हटलं गेलं. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यानं तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. तो स्वत: म्हणतोय की मी राषट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकारी आहे. रोहित पवारांनी स्वत: पोलीस निरीक्षकाला फोन केला. काय संबंध? योगेश सावंतचाही पत्ता बारामती मतदारसंघातला आहे. आता योगेश सावांतच्या मागे कोण कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा संबंध काय? रोहित पवारांनी फोन केला होता का? त्याचं कारण काय? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.