‘राम मांसाहारी होता’ जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजप नेते भडकले!
![Ram Kadam said that a complaint should be filed against Jitendra Awhad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Jitendra-Awhad--780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. राम मांसाहारी होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आव्हाडांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपाचे आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करावी, अशी मागणी केली आहे.
राम कदम म्हणाले, जितेंद्र आव्हाड म्हणाले राम मांसाहारी होता. त्यांनी हा जावईशोध कुठून लावला? रामाविषयी आमच्या मनात आदर आहे. रामाविषयी प्रत्येक हिंदू माणसाच्या मनात आदर आहे. असं असताना जाणीवपूर्वक आमच्या भावना दुखावण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. हा हिंदू जनभावनेशी खेळ आहे. मला आता प्रश्न आहे की उद्धव ठाकरे कुठे आहेत? ते या सगळ्यावर गप्प का बसले आहेत? शरद पवार गटातल्या लोकांना तुम्ही रामाविषयी असं कसं काय बोलता? हा प्रश्न ते का विचारत नाहीत? असं ते म्हणाले.
हेही वाचा – महापालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आमदार लांडगे सरसावले!
जे काही घडतं आहे ते आधीपासून ठरलं आहे. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या विरोधात आहेत. मंदिर उभं राहिल्यानंतर अशा प्रकारची टीका त्यांच्याकडून आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांकडून होते आहे. आता रामाला मांसाहरी म्हणून त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. राम मांसाहरी नव्हता. कंदमुळं, फळं आणि भाज्या खाऊन त्याने वनवासात उदरनिर्वाह केला. हे सगळं यांना माहीत आहे. तरीही मतपेटीच्या राजकारणातून अशी वक्तव्य करत आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी याबाबत भूमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातले रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवतील, असं राम कदम म्हणाले.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार? मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.