‘निकालानंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील’; राज ठाकरेंचं सूचक विधान
![Raj Thackeray said there will be surprises in Maharashtra after the results](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Raj-Thackeray-1-780x470.jpg)
Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात मनसेच्या पाठिंब्यावरच महायुतीचं सरकार स्थापन होईल, असं विधान केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार हे स्पष्ट झालं होतं. पण आता राज ठाकरेंची केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, की या निवडणुकीत काय होईल हे कुणीच सांगू शकत नाहीये. मला वाटतं यावेळी अनेक गोष्टींचे वेगवेगळे सरप्राईजेस मिळतील. अजून ८-१० दिवस थांबा. मग तुम्हाला कळेल काय सरप्राईजेस आहेत. सरप्राईजबद्दल आधीच कसं सांगणार?
हेही वाचा – ‘मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, माझं..’; मनोज जरांगे पाटील यांचं प्रकृतीबाबत मोठं विधान!
मी बोलता बोलता म्हणालो की भाजपाचं सरकार येईल म्हणजे युतीचं सरकार येईल. त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ही माझी इच्छा नव्हे तर माझं भाकित आहे. ती युती आहे. त्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे ते ठरवतील. पण आमच्या पाठिंब्याशिवाय त्यांचं सरकार स्थापन होणार नाही हे निश्चित आहे. तुम्ही बघालच, असं राज ठाकरे म्हणाले.
भाजपालाच का पाठिंबा दिला असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला असता. ते म्हणाले, शिवसेनेत असल्यापासून माझा भाजपाशीच दुसरा राजकीय पक्ष म्हणून संबंध आला. काँग्रेस-राष्ट्रवादीशी माझा तसा संबंध आला नाही. ज्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकता, त्यांच्यासोबतच तुम्ही राहू शकता, असंही राज ठाकरे म्हणाले.