सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले,..स्वायत्तता टिकायलाच हवी
![Raj Thackeray said that the autonomy of democratic institutions must be preserved](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/raj-thackeray-780x470.jpg)
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राषट्रपतींनी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीट करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नवा कायदा होईपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करते. लोकशाही संस्थांची स्वायत्तता टिकायलाच हवी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते.