‘मोदी होते म्हणून राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा झालं नसतं’; राज ठाकरे
![Raj Thackeray said that Ram temple could be built because of Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Raj-Thackeray-1-780x470.jpg)
मुंबई | देशात सात टप्यात निवडणुका होत असून निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या निमित्त महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात होते. यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतींची सभा पार पडली. या प्रचारसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं जाहीर कौतुक केलं.
राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलं आहे, काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम रद्द झालं आहे आणि तिहेरी तलाक कायदा रद्द झाला आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी हे तीन धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवं.
हेही वाचा – ‘…तर तुमचा मतांचा अधिकार संकटात येईल’; शरद पवार यांचा मोठा दावा
आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, औवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे, त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत त्यावर कायमचा चाप बसवा, असं राज ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.