राजनी दिले उद्धवना टेन्शन !
राज ठाकरेंच्या मनात नेमके काय ? ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाबाबत चकार शब्दही नाही !
इगतपुरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन दिवसांचे शिबिर इगतपुरी येथे सुरू झाले आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांना भरपूर टेन्शन दिले आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाबद्दल चकार शब्दही काढला नाही.
तमाम राजकारण्यांचे लक्ष..
ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांचे मनोमीलन होऊन पुढील निवडणुकांमध्ये ‘ठाकरे पॅटर्न’ यशस्वी होईल, असे सांगणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या टाळीसाठी हात पुढे केला असला तरी अद्याप टाळी मिळालेली नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे आणि त्यांच्या शिवसेना गटाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
राज ठाकरेंच्या मनात नेमके काय ?
हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर महायुती सरकारने हिंदीच्या सक्तीचे दोन जीआर रद्द केल्यामुळे ठाकरे बंधूंनी मोठ्या प्रमाणावर विजयी मेळावा घेतला, त्यावेळची सर्वांची वक्तव्ये पाहून त्यांचे मनोमीलन होणार, हे निश्चित समजले जात होते. पण, सध्या तरी या वृत्ताला सुरुंग लागला आहे.
मनसेच्या शिबिरात काय वक्तव्ये?
विजयी मेळाव्यानंतर ‘ठाकरे पॅटर्न’ एकदम चर्चेत आला आणि एकत्र निवडणुका लढवल्यास त्याचा महाराष्ट्रात तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलाच फायदा होईल, असे सर्वांनी मत व्यक्त केले. याला पार्श्वभूमी होती ती म्हणजे, शिवसेना-ठाकरे गट आणि मनसे यांच्या ‘युती’ ची जोरदार चर्चा! या पार्श्वभूमीवर आता मनसेच्या शिबिरातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
हेही वाचा – शुभांशू शुक्ला आज पृथ्वीवर परतणार, भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण; जाणून घ्या..
आंदोलन मनसेचे, उद्धव सामील..
राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले होते, पहिली पासून हिंदींची सक्ती नको, अशी उघड भूमिका मनसेची होती. मनसेने आपल्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभारले, त्यानंतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाने देखील उडी घेतली. अखेर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत काढलेले दोन्ही जीआर रद्द केले. त्याचप्रमाणे, त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.
विजयी मेळाव्याचे आयोजन..
दरम्यान, त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्यानंतर मुंबईत विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उद्धव आणि राज ठाकरे बंधू उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शनही केले. या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. मात्र, राज ठाकरे यांच्या पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
मनसेच्या शिबिरात विचारमंथन..
त्यातच आता सोमवारपासून इगतपुरी येथे मनसेचे शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरात मोठ्या प्रमाणावर विचारमंथन होण्याची शक्यता वर्तवली जात होते. मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे राज ठाकरे यांनी उद्गार काढल्यामुळे उद्धव यांच्या पक्षाचे टेन्शन चांगलेच वाढले असून पुढे काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. नोव्हेंबर – डिसेंबरदरम्यान चित्र पाहूनच ‘युती’ चा निर्णय घेऊ, असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान म्हटले आहे.
राज ठाकरे यांचा सावध पवित्रा
राज ठाकरे यांनी इगतपुरीमध्ये युतीबाबत मोठे वक्तव्य केले असून त्याचीच सर्वत्र जोरदार चर्चा आहे. युतीबाबत शिवसेना ठाकरे गटाने टाळी दिलेली असताना दुसरीकडे मात्र मनसे सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा ‘सस्पेन्स’ आता आणखी वाढला आहे.
राज ठाकरेंचा तीन दिवस मुक्काम
मनसेने नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर तीन दिवसांचे असून तीनही दिवस राज ठाकरे यांचा मुक्काम इगतपुरी येथे असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
चर्चा बाळा नांदगावकर यांच्या वक्तव्याची!
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यांची भूमिका काय हे संपूर्ण महाराष्ट्राला आत्ताच सांगण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना मनसेचे प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी त्या वक्तव्याला बगल दिली होती. मनसे पक्षाने यापूर्वी स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत, त्याची आम्हाला सवय आहे, असा एक टोला मारून त्यांनी राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली की काय, असे म्हणायला आता हरकत नाही !





