राहुल सोलापूरकरांविरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन
कार्यकर्त्यांनी सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध
![Rahul Solapurkar, Protest, Pune, Shiv Sena, Thackeray, Faction, Agitation,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/solapur-780x470.jpg)
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. “ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारींनी अपमान केला होता, त्याच पद्धतीने संघाशी संबंधित या व्यक्तीने महाराजांचा अवमान केला आहे. सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही, तर त्यांनाही आम्ही काळं फासून उत्तर देणार. शिवसेनेनं ठरवलं तर त्यांना रस्त्यावरही उतरू देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका शिवसेना शहरप्रमुखांनी मांडली. सोलापूरकरांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
“राहुल सोलापूरकर मला गावला, तर मी त्याला सोडणार नाही. त्याच्या तोंडाला काळं फासणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला सुरक्षा कसली देता? त्याच्यावर कारवाई करायचं सोडून घराबाहेर पोलीस तैनात केले आहेत”, असं आक्रमक वक्तव्य ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने या आंदोलनात केलंय.
हेही वाचा : कर्जाचा EMI कमी होणार! RBI कडून रेपोदरात कपात
राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं ते एका पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त झाला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
राहुल सोलापूरकर काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो,” असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.